रावलपिंडीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानने बांगलादेशी गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. 6 गडी बाद 448 धावा करत डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशने जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शदमन इस्लाम आणि मोमिनुल हक यांनी तिसऱ्या गड्यासाठी चांगली भागीदारी केली. पण तरीही पाकिस्तानचं पारडं जड आहे. एकीकडे पहिल्याच कसोटीत बांगलादेशचं टेन्शन वाढलं असताना त्यात आणखी एक भर पडली. दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या अडचणीत वाढ झाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शाकिब अल हसनवर एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. यात शाकिबच नाही तर बांगलादेशची माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 500 जणांना आरोपी केलं गेलं आहे. शाकिब अल हसन सध्या रावलपिंडीत कसोटी खेळत आहे आणि 27 षटकात 109 धावा देत एक गडी बाद केला आहे.
शाकिब अल हसन बांगलादेशच्या अवामी लीगचा नेता आहे. हा पक्ष शेख हसीना यांचा आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतर होताच शेख हसीना यांनी देश सोडला. त्यामुळे पक्षाशी निगडीत सर्वजण अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे शाकिब अल हसनवर गुन्हा दाखल केल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशी मिडिया रिपोर्टनुसार, शाकिब विरोधात ढाकाच्या मेट्रोपॉलिटन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव रफिकुल इस्लाम आहे. ढाक्यात विरोध प्रदर्शन करत असताना त्याच्या वडिलांची हत्या झाली होती.
बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजा यालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंसक जमावाने त्याच्याही घरावर हल्ला केला होता. तसेच घराला आग लावली होती. आता शाकिब अल हसन रडावर आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने भविष्यात त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कसोटी सामना पूर्ण होताच शाकीब अल हसन बांगलादेशमध्ये जाण्याबाबत शंका आहे. त्याचं घर बांगलादेशच्या खुलनामध्ये आहे. तर त्याची पत्नी आणि मुलं अमेरिकेत राहतात. बांगलादेशमधील स्थिती पाहता शाकिब अल हसन थेट अमेरिकेला जाईल असं दिसत आहे.
