Explore

Search

April 17, 2025 5:42 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील १२ वी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.

कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहणार असून या कालावधीत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय शासकीय योजनांची माहिती जनतेला व्हावी आणि त्या माध्यमातून जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमागे १ व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे १ असे एकूण ५० हजार योजनादूत राज्यात नेमण्यात येणार आहेत. यांचेही विद्यावेतन या योजनेतून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही युवांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy