नाक्या नाक्यावर पोलिसांचा पहारा
मुंबई : मुंबईला पुढील पाच दिवस छावणीचे स्वरुप राहणार आहे. आज सकाळपासूनच नाक्या-नाक्यावर आणि मुख्य चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा पहारा आहे. पुढील पाच दिवस पोलिसांसाठी महत्वाचे आहे. आता पुढील काही महिने पोलिसांना खडा पहारा द्यावा लागणार आहे. सणवारासोबतच यंदा विधानसभेची निवडणूक पण येऊ घातल्याने पोलिसांवर कामाचा ताण असणार आहे.
पुढील पाच दिवस महत्वाचे
बदलापुरमध्ये दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी दिलेली महाराष्ट्र बंदची हाक, चेहलम, कृष्णजन्म व गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच दिवस पाच दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कोणताही अुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
विरोधकांचे निषेध आंदोलन
विरोधकांनी बंदची हाक दिल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पातळीवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनास बंदी घातली असली तरी राज्य घटनेने दिलेल्या घटनादत्त अधिकारांचा वापर करत विरोधक निषेध आंदोलन करणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होईल. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.
२४ ते २८ ऑगस्ट दरम्यान अलर्ट
महाराष्ट्र बंद, चेहलम, कृष्णजन्म व गोपाळकाला याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान पाच दिवस विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या काळात पोलीस खबऱ्यांचे नेटवर्क पणाला लावतील. पोलीस अलर्ट मोडवर असतील. नाकाबंदी आणि शोध मोहिमेत अट्टल गुन्हेगारांना जरब बसेल.
तगडा बंदोबस्त
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वत्र नाकाबंदी व शोधमोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खेळाडू, विशेष शाखा, पोलीस दवाखाना, कॅन्टीन अशा ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या पोलिसांनाही बंदोबस्तासाठी तैनात करण्याची सूचना करण्यात आली होती. राज्य राखीव पोलीस दल, शीघ्रकृती दल, दंगल विरोधी पथकाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे.
