पुणे : दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडे सातशे पोलीस तसेच होमगार्ड व एसआरपीएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त देखील असणार आहे. शहरात उत्साही वातावरण असून, यानिमित्ताने पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर नजर असणार आहे.
पुण्याच्या मध्यभागासह उपनगरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. दहीहंडीत लेझर बीम लाईट तसेच डीजेचा दणदणाट असतो. त्यावर तरुणाई थिरकते. सायंकाळपासून सुरू झालेला हा उत्सव रात्री दहापर्यंत चालतो दरम्यान, यंदा दहीहंडीनिमित्त शहरातील अनेक मंडळांनी खास लेझर शो आयोजित केला असून, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद, दिल्ली येथून साऊंड सिस्टीम देखील मागवण्यात आलेल्या आहेत. रविवारी रात्रीपासून मध्यभागासह उपनगरात मंडळांनी लोखंडी सांगाडे उभे केले आहेत. तर डीजे देखील लावले असून, त्यावर लेझर बीम लावले आहेत. रंगीत तालीम आदल्या दिवशी घेतली आहे.
वाहतुकीबाबत पोलीस सतर्क
साडे सातशे अधिकाऱ्यांव्यतिरीक्त स्थानिक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त असणार आहे. त्यासोबतच वाहतूक पोलिसांनीही त्यांचा वेगळा बंदोबस्त ठेवला असून, वाहतूकीला अडथळानिर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.
कारवाईचा इशारा
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारपासून (२४ ऑगस्ट) पुढील ६० दिवस लेझर बीमचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. संबंधित आदेशाचा भंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
डीजे तसेच लेझर बीमबाबत दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करणे गरजेचे आहे. दहीहंडीनिमित्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गैरप्रकार, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात आहेत. – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक
