नौदलाने दिले स्पष्टीकरण
मालवण : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केवळ आठ महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या पुतळा कोसळ्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. समुद्री वाऱ्यामुळे हा पुतळा पडला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कशामुळे पडला याचे कारण नौदलाने स्पष्ट केले आहे.
राजकोटवर ४ डिसेंबर रोजी मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा नेमका कोणत्या कारणामुळे पडला याचे स्पष्टीकरण नौदलाने दिले आहे. नौदलाने याबाबत निवेदन जारी केले. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर सिंधुदुर्गमधील नागरिकांना समर्पित अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र आज या पुतळ्याची जी काही हानी झाली आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय, अशा भावना व्यक्त करण्यात आली आहे.
पुढे निवदेनात म्हणण्यात आले आहे की, घडलेल्या या दुर्दैवी अपघाताच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी, लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य पाऊले उचलली जातील. त्यासाठी राज्य सरकार व संबंधित विभागातील तज्ज्ञांसह चर्चा करण्यासाठी नौदलानकडून एक पथक देखील तयार करण्यात आले आहे, अशी माहिती नौदलाने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा कोसळ्यामुळे महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला या पुतळा उभारणीचे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे संचालक आणि केतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
