Explore

Search

April 15, 2025 9:08 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : शासनाने नवीन महाबळेश्वरचा आराखडा जनतेसमोर मांडावा : डॉ. भारत पाटणकर

सातारा : महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्प स्थानिकांच्या विकासासाठी असेल तर ते चांगलंच आहे. तथापि या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा शासनाने जनतेसमोर खुला करावा. त्यानंतर कोयना खोऱ्यातील स्थानिक जनताच नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत निर्णय घेईल, असे मत कष्टकरी, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे व्यक्त केले.

येथील सुटा कार्यालयात नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी नागरिक व कोयना विभागातील भूमिपुत्र यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटणकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके, अस्लम तडसरकर, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ॲड. राजेंद्र गलांडे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, राज्य शासनाने शिवसागर जलाशयाच्या काठावर नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि त्यामध्ये नेमकं शासन काय करणार, त्याचा लाभ स्थानिक जनतेला कसा होणार हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम शासनाने प्रथम दूर करावा. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात नेमकं काय होणार, कुठे होणार, कधी होणार याबाबतची भूमिका स्पष्ट करणारा प्रारूप आराखडा जनतेसमोर मांडावा. आम्ही तो घेऊन स्थानिक लोकांपर्यंत जाऊ त्यानंतर स्थानिक जनता त्यावर निर्णय घेईल.

आमचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला विरोध नाही. स्थानिक जनतेच्या हितासाठी शासन पुढाकार घेऊन काही चांगली योजना राबवत असेल तर त्याचे निश्चितपणे स्वागत करू. प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पात नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, याचे चित्र जनतेसमोर स्पष्ट नाही. ते स्पष्ट होण्यासाठी जनतेपुढे प्रकल्प आराखडा मांडणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाचा आराखडा जनतेसमोर खुला करावा, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी अस्लम तडसरकर, सुनील भोईटे, ॲड. राजेंद्र गलांडे, शैलेंद्र पाटील यांनी मते मांडली. यावेळी प्रकाश साळुंखे, गोविंद शिंदकर, आनंदा सपकाळ, संतोष गोटल, विजय निकम, प्रकाश खटावकर आदी उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy