गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा
मुंबई : गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच इथं एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आणि राज्यातील अनेक एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. काही आगारांमधून एकही एसटी प्रवासाला निघाली नाही. ज्यामुळं प्रवाशांचे आतोनात हाल झाले. प्रामुख्यानं कोकणच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांकडे एसटीचं आरक्षण असताना त्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हे सारं चित्र पाहता इथं एसटीमुळं खोळंबा होत असतानाच तिथं कोकण रेल्वे पुन्हा एकदा कोकणकरांच्या मदतीला धावली आहे.
X च्या माध्यमातून कोकण रेल्वेनं अधिकृत माहिती देत आणखी एक गणपती विशेष रेल्वे चालवली जाणार असल्याचं सांगितलं. ‘प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त आणखी एक अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01103/01104 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून कुडाळ आणि पुन्हा सीएसएमटी असा पूर्ण प्रवास करेल.
गाडी क्रमांक 01103 मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कुडाळ रोखानं प्रवास सुरु करेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता कुडाळला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01104 कुडाळ- मुंबई छशिमट (विशेष) अनारक्षित निर्धारित स्थानकातून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता मुंबईत पोहोचेल.
अधिकृत माहितीनुसार या गाडीला 20 कोच असून त्यापैकी 14 कोच जनरल श्रेणीतील असतील, तर चार कोच स्लीपर असतील. या रेल्वेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटसह आयआरसीटीसी (IRCTC)च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
