Explore

Search

April 15, 2025 9:13 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Baramati : सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

बारामती :  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दि. ७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महावितरणकडून  गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीजदराप्रमाणेच सवलतीच्या दरात वीजपुरवठा मिळणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी  घेतली जात नाही. अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचा पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.  विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy