गौरी आगमनाची लगबग; फराळाच्या पदार्थांना बाजारात मागणी
सातारा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात, साश्रुनयनांनी सातारा शहरातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरण विसर्जन करण्यात आले. एकूण ५ हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठा गौरीच्या स्वागताचे वेध लागले आहेत. या आगमनामुळे फळे तसेच फराळांच्या विविध पदार्थांना चांगलीच मागणी वाढली आहे.
शनिवारी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. बच्चे कंपनीला बाप्पाच्या आगमनाचा आनंद झाला होता. पूजा, आरती, प्रसाद नाचगाणीत बच्चेकंपनी दंग होते. ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आले.
गौरीच्या आगमनामुळे महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येत आहे. गौरी पुढील सजावट, गौरीचे पारंपारीक देखणे स्वागत याकरीता गौरीच्या आकर्षक मुखवट्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सातारा शहरातील राजवाडा, सदाशिव पेठ, मोती चौक, पोवईनाका येथील विविध वस्तूंचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. गौरींना नेसवण्यात येणाऱ्या आकर्षक साड्या, त्यांच्या गळ्यातील दागिने, मंगळसूत्र, नेकलेस , बाजूबंद, कंबरपट्टे, माळा, लक्ष्मीहार, मोत्यांची माळ, कानातले टॉप्स, रिंगा, झुबे छोट्या दागिन्यांची खरेदी महिला मोठ्या उत्साहाने करत आहेत.
दरम्यान, सातारा शहरात दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. या विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती शाळा, भवानी तलाव, मंगळवार तळे, दगडी शाळा, बुधवार नाका परिसर, आयुर्वेदीक गार्डन कल्याणी शाळा येथे विसर्जनाची सोय करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत गणेश भक्तांनी गणरायाला पंरपरेप्रमाणे निरोप दिला.
