Explore

Search

April 13, 2025 11:09 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सातारा शहरातील भिमाई स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी

राज्य शासनाला अंतिम आराखडा सादर होणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

सातारा : जरंडेश्वर नाका परिसरातील माता भिमाई आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय भवनांच्या विभागामार्फत निधी आणण्यात येऊन स्मारकासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल व त्याचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
भिमाई स्मारकाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांत सुधाकर भोसले, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, माता-भिमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
2014 पासून भिमाई स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. त्याच्या आढाव्या संदर्भात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, या संदर्भातील अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर केला जाईल. भिमाई स्मारक समितीचा ना-हरकत दाखला घेऊन सामाजिक न्यायभवनाच्या माध्यमातून एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. याचा अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर केला जाईल व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी पहिल्या टप्प्यांमध्ये या कामासाठी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. ज्या जागेवर माता भिमाबाई आंबेडकर यांचा अंत्यविधी झाला आहे, त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले जाईल. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेला आमणे बंगला व त्यांचे प्राथमिक शिक्षण ज्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये झाले ती शाळा या संदर्भामध्ये निधी उभारणे बाबत स्वतंत्र बैठका घेतल्या जातील. हा प्रश्न पुढील टप्प्यात सोडवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याशिवाय दिनांक 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पाटण विधानसभा मतदारसंघातील काही विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, नाटोशी उपसा केंद्राच्या पाच नवीन उपसा योजनांचा प्रारंभ यासह विविध कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व महायुतीचा एक मोठा मेळावा या निमित्ताने आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सातारा शहरात डॉल्बी वाजवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिल्याचा प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांना डॉल्बी संदर्भातील कायदे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये या संदर्भात कोणते कायदे पारित असून त्याची अंमलबजावणी कशी होते, याची माहिती अवगत केली जाईल. पण गणेशोत्सवामध्ये डॉल्बी वाजवण्यासंदर्भात कोर्टाने जे नियम प्रमाणित केलेले आहेत, त्या पद्धतीनेच गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी होईल. नियमभंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच लेझर लाईटचा अजिबात वापर होणार नाही. याचा वापर करणार्‍यांवर निश्चित गुन्हे दाखल केले जातील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या संदर्भात त्यांना विचारले असता शंभूराज म्हणाले, नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील जी गावे ज्या विधानसभा मतदारसंघात आहेत, त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी चर्चा मुख्यमंत्री करत आहेत. या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या जात असून त्याचा ग्राउंड मॅप तयार झालेला आहे. येथील लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवणे, पर्यावरण पूरक पर्यटन विकसित करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. तसेच महाबळेश्वरच्या गिरीस्थानावरील पर्यटनाचा ताण कमी करणे हा या मागचा उद्देश आहे. ही विविध कारणे तपासली असता यामध्ये रोजगार निर्मिती आणि पर्यटनवृध्दी दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. त्यामुळे सर्व चर्चा करूनच या संदर्भातील निर्णय होतील.
डॉक्टर भारत पाटणकर यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्याविषयी हरकत घेतली होती. त्यावर बोलताना शंभूराज म्हणाले, या आराखड्याची माहिती त्यांना दिली जाईल. त्याकरता त्यांच्यासमवेत पुन्हा स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल. बैठकीपूर्वी आमदार शशिकांत शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कमराबंद चर्चा झाली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना छेडले असता ते म्हणाले, ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि मी विधानसभेचा. ते आमचे सहकारी आहेत. आमची कोणतीही कमराबंद चर्चा झाली नाही, केवळ अनौपचारिक गप्पा झाल्या.
कोरेगावचे पोलीस विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्या संदर्भात बोलताना शंभूराज म्हणाले, आमच्या अनौपचारिक बैठकीत त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत. सरकारवर टीका करणे हे त्यांचे काम आहे. या संदर्भात त्यांनी माझ्याकडे जर तक्रार केली असती तर त्याची शहानिशा करून त्या संदर्भामध्ये विचारविनिमय निश्चित केला असता, असे त्यांनी सांगितले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy