Explore

Search

April 15, 2025 9:24 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Mumbai Ganpati Visarjan : गणेशमुर्तींचे विसर्जन पार पाडण्यासाठी  मुंबई महापालिका झाली सज्ज 

मुंबईतील विविध चौपाट्यांवर 761 जीवरक्षक केले तैनात

मुंबई : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. उद्या मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क यांसह ठिकठिकाणी मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईतील विविध चौपाट्यांवर 761 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. तसेच ४८ मोटरबोटी तैनात आणि २३ हजार ४०० पोलीस कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबतच वॉर्म, जेली फिश आणि स्टिंग रे यासारख्या दंश करणाऱ्या मासांपासून सावध राहा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईत उद्या मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. यंदा विसर्जन सरळ, सुलभ आणि निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी, डॉक्टर उद्या कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच चौपाट्यांवर नियंत्रण कक्ष, डॉक्टरांची सुविधा, अग्निशमन केंद्राचे जवान, कोस्टगार्ड आणि टेहाळणी बूरूजसह विविध सोयीसुविधांची तयारी करण्यात आली आहे.

छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी खास तराफा

अनंत चतुर्दशीला मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूत अडकू नयेत यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या मुंबईतील चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात आहेत. तसेच विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने यंदा तब्बल २०४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ‘क्यू आर कोड’द्वारे भाविकांना, गणेश भक्तांना या कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. तसेच https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGanpatiDeQR या लिंकवरूनही कृत्रिम तलावांची माहिती मिळू शकते.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी :

१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये. २. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी. ३. अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे. ४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये. ५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे. ६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

दरम्यान ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबईतील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ असे अनेक मासे दिसून येतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. तसेच मत्स्यदंश झाल्यास चौपाटी परिसरात असलेल्या वैद्यकीय कक्षातून मदत घ्यावी. तसेच चौपाट्यांवर ‘१०८ रूग्णवाहिका’ ही तैनात करण्यात आली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy