१ नोव्हेंबरपासून केवायसीची ही अट होणार लागू
मुंबई : केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी आखून दिलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचे शिधापत्र रद्द करण्यात येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून केवायसीची ही अट लागू होणार आहे. केवायसी न केलेल्यांना रेशन दुकानावर स्वस्त धान्य मिळणे बंद होणार आहे.
स्वस्त धान्य योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरीब व गरजू लाभार्थ्यांना व्हावा या हेतूने केंद्र सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला केवायसी करणे अनिवार्य केले आहे़ यासंबंधीचा आदेश याआधीच जारी करण्यात आला होता. आता ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे.
शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्याला पुढच्या महिन्यात स्वस्त दराने रेशन मिळणार नाही. अशा शिधापत्रिकाधारकांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यात येतील. ई-केवायसी नसलेली शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रेशन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका आवश्यक आहे. परंतु शिधापत्रिकांवर असे अनेक लोक आहेत जे आता हयात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांची नावे अद्यापही शिधापत्रिकांमधून वगळण्यात आलेली नाहीत. आता या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ई-केवायसी करता येणार आहे.
