Explore

Search

April 15, 2025 9:26 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : डोळ्यादेखत मूकबधिर मुलगा बंधाऱ्यात बुडाला

मूकबधिर आईलाही ओरडताही आले नाही

सातारा : म्हसवड येथील शेंबडे वस्ती येथे आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या मूकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हणमंत मोहन शेंबडे (वय १८, रा. शेंबडेवस्ती- म्हसवड) असे मृत्यू झालेल्या मूकबधीर विद्यार्थ्यांचे नाव आहे. आईसमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हणमंत मोहन शेंबडे हा मूकबधीर विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात सातारा येथील मुकबधीर विद्यालयात शिक्षण घेत होता. गणेशोत्सवामुळे तीन-चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी आला होता. आज दुपारी एक वाजता हणमंत शेंबडे हा आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेला होता.

हणमंतची आईसुद्धा मुकबधीर आहे. माणगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे. हणमंत शेंबडे सुध्दा आईला नदीच्या काठावर उभं करून दोरखंडाच्या सहाय्याने नदीपार करत होता. मात्र, नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हणमंत शेंबडे यांचा हातातून कासरा निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला.

मूकबधीर मुलगा आईच्या समोर वाहून गेला. त्या माऊलीला साधे ओरडतासुध्दा आले नाही. मुलगा पाण्यात वाहत गेल्याचे त्या आईनं घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे आणि इतरांना सांगितले. ही घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस, म्हसवड पालिकेचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या हणमंतचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत हणमंत शेंबडे हा सापडला नाही. आता शोध कार्य सोमवारी सकाळी सुरू करण्यात येणार आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार जयकुमार गोरे, दहिवडी उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, आप्पासाहेब पुकळे, म्हसवड महसूल मंडल निरीक्षक, तलाठी, पोलिस कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy