जालना: मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे. ही मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली आणखी एक संधी आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होतं. आता तुम्ही या अगर येऊ नका, आपण आपली प्रक्रिया राबवत असतो. कोणी आले म्हणून आंदोलन होत नसते. पण राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण) दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. ते सोमवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यास जरांगेंचा पाठिंबा :
राज्य सरकारकडून धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी भाष्य करताना म्हटले की, सरकारने केलेली गोष्ट चांगली आहे. त्यांची मागणी आजची नाही. त्यांच्या मुलांना आणखी फायदा होईल. त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून ST मधून आरक्षण मिळाले पाहिजे. सर्व बांधवांनी ताकदीने पंढरपूरच्या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे. छगन भुजबळने पंढरपुरला जावं आणि धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. धनगर बांधवांना विनंती आहे की, उगाच भांडण विकत घेऊ नका, भुजबळांशी भांडण करू नका. छगन भुजबळ बुद्धीभेद करून दंगली घडवणार आहेत. एकाही धनगर आणि ओबीसी नेत्यांना मी दोष दिला नाही. पण भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
