जनसंवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणूक लढविण्याची एकमुखी मागणी
सातारा : कोणी काहीही सांगितले तरी आता माघार नाही, माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत. त्यामुळे तुमच्या भरवशावर आगामी विधानसभा निवडणुक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी मेढा येथे केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मेढा येथे आयोजित जन संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या जनसंवाद मेळाव्यात सातारा-जावलीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अमितदादा कदम यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, जावली बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, जावली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष साधू चिकणे, विलास दुंदळे, सोमनाथ कदम, दत्तात्रय लकडे, विठ्ठल पवार, प्रमोद जाधव, सचिन राजेशिर्के, सुनिल दिवडे, नितिन शिंदे, बाळासाहेब ओंबळे, संजयदादा पाटील, सरपंच विष्णु साळुंखे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसंवाद मेळाव्यात बोलताना अमितदादा कदम म्हणाले, जनसामांन्याची समस्या सोडविण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनावर दडपण आहे. आज सातारा-जावलीतील बहुसंख्य कार्यकर्ते विश्वासाने माझ्याकडे येत असतात. त्यांना परिवर्तन हवे आहे. सातारा-जावलीतील निवडणूक आता जनतेने हाती घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यावर मी नक्कीच विजयी होईन. सर्वसामान्य माणसाच्या मनात आले तर ते काहीही करू शकतात. जनतेने हातात घेतलेली ही चळवळ आहे. अमितदादा कदम उभा राहील; परंतु तुमची साथ असणे गरजेचे आहे. माझ्याकडे कारखाना नाही किंवा सहकारी संस्था नाहीत. पण सामान्य जनतेसाठी मी आहे. विद्यमान नेतृत्वाला बोंडारवाडी चा प्रश्न सोडविता येत नाही. महु-हातगेघर धरणाचा प्रश्न प्रलंबीत आहे. इथला तरुण उपजिविकेसाठी पुण्या-मुंबईत जात आहे. सभापती असतानाही या मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली आहेत. तसेच सत्ता नसतानाही केली आहेत. माझ्या मतदारांवर माझे प्रेम आहे. तसेच मतदारांचेही माझ्यावर तेवढेच प्रेम आहे. मक्तेदारांसाठी विकास नको. त्याच-त्याच रस्त्यावर पैसे खर्च करून खड्डे पडताहेत, आदी प्रश्न उपस्थित करत आपल्या विरोधकांवर त्यांनी तोफ डागली.
यावेळी उपस्थित लोकांनी अमितदादा कदम यांच्याशी संवाद साधताना जावलीतील दहशत संपवा, जावलीत रोजगार उपलब्ध व्हावा, शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत कोणाचे लक्ष नाही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अमितदादा कदमांनी उमेवारी जाहीर करावी, दादांच्या पाठीमागे 100 टक्के राहणार, पुनर्वसनाबाबत महसूल विभाग व नेते उदासिन आहेत आदी प्रश्न उपस्थित करत अमितदादा कदम यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.
यावेळी बाळासाहेब बाबर, साधू चिकणे, नितीन शिंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधू चिकणे यांनी केले, तर आभार योगेश गोळे यांनी मानले.
