पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चार चाकी चालकाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात काल(सोमवारी) रात्री हा अपघात घडला आहे. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी आज पुण्यात होते. यावेळी एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली. या घटनेत गाडीचे काही प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती आहे. सुदैवाने चंद्रकांत पाटील यातून थोडक्यात बचावले.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मद्यपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे. पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “मद्यपी चालकाच्या कारनं माझ्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या कारमध्ये असलेले तरूण आणि तरूणी मद्य पिऊन तर्रर्र होते. अपघानंतर तरूणांना पकडण्यात आलं. तर तरूणी पळून गेल्या होत्या. माझी कार पुढे गेली अन्यथा मी तुमच्यासमोर दिसलो नसतो. याला गृहमंत्री कसे जबाबदारी असतील? का गृहमंत्र्यांनी तिथे उभारले पाहिजे?, अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी तरूणींना ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांनी गडबड केली, तर चुकीचं आहे. गृहमंत्र्यांनी ‘अॅक्शन’ घेतली पाहिजे. त्या मद्यपी तरूण आणि तरूणींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुण्यात चाललंय काय?” असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
