मुंबई : मुंबईतील धारावी भागात आज तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडला. त्यामुळे धारावीत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या वाहनांचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या पथकाच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धारावीत नेमकं काय झालं?
आज सकाळी मुंबई महापालिकेचं पथक धारावीत दाखल झालं. बीएमसीचं पथक धारावीत आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना अडवलं. संतप्त नागरिकांनी बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या. तर रस्ताही अडवण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंदोबस्त वाढवला. स्थानिकांनी चर्चा करत पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थितीवर मार्ग काढायला सुरुवात केली.
