Explore

Search

April 13, 2025 12:56 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Prasad of Sri Tirupati Temple : प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच : सुनील घनवट, मंदिर महासंघ

मुंबई : जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर बाब आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना श्री तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते, मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते, मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले आदी अनेक पापे त्या काळात करण्यात आली. त्याचाच पुढचा भाग म्हणजे या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले,  असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ज्यांनी हे महापाप केले आहे, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी केली. याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील दादर (पू.) रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाचे सदस्यांसह, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

आता केवळ या प्रसादाच्या लाडूच्या प्रकरणाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपति मंदिराशी निगडीत घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यातील जे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले असतील, ते सर्व तात्काळ रहित करण्यात यावेत, अशी मागणी ‘मंदिर महासंघा’ने आंध प्रदेश सरकारकडे केली आहे.

हे प्रकरण म्हणजे मंदिर सरकारीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणता येईल. देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये अशा प्रकारे धर्मभ्रष्टता वा हिंदु धर्मविरोधी कृती तर होत नाहीत ना, याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेत सहभागी भक्त ज्या हॉटेल वा धाब्यावर थांबत होते, त्यांच्या जेवणामध्ये थुंकणे, लघुशंका करणे आदी विकृती समोर आल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांच्या बाहेर देवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि हार यांनाही थुंकी लावण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. केवळ ‘थूंक जिहाद’च नव्हे, तर सध्या मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरापांसून केरळमधील अनेक मंदिरांमधील देवाचा प्रसाद हा ‘हलाल उत्पादनां’पासून बनवण्याचा प्रकार समोर आला. धर्मपरायण हिंदू कदापि हे सहन करू शकत नाहीत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला धर्माचरणाचे स्वातंत्र्य दिलेले असतांना त्यात अशा प्रकारे बाधा आणणे, हा गंभीर अपराध आहे. हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण करणे, हे सरकारचे दायित्व आहे. मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा, अशी मागणी करण्याची वेळ आज आली आहे. यासाठी हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy