Explore

Search

April 13, 2025 11:07 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune News : पुण्यात ‘ऑपरेशन टँकर’ पडले पार 

पुणे : पुण्यात समाधान चौक परिसरात पुणे महापालिकेकडून ‘ऑपरेशन टँकर’ पार पडलं. हे ऑपरेशन पार पाडण्यामागील कारणही तसंच आहे. समाधान चौक जवळ सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात पुणे महापालिकेचा ट्रक ड्रेनेज साफ करण्यासाठी गेला होता. हा ट्रक आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गेला होता. यावेळी ट्रक मागे घेतला जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रक तसाच त्या खड्ड्यात जावून कोसळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. घटना अतिशय भयानक होती. ट्रक रिव्हर्स होत असताना ट्रकची मागची चाकं उभ्या असलेल्या ठिकाणची जमिनी अचानक खाली गेली. तिथे खोल खड्डा पडला आणि पाहता-पाहता संपूर्ण ट्रक खाली कोसळला. यानंतर तिथे असलेल्या इतर नागरिकांनी ट्रकच्या दिशेला धाव घेतली. यावेळी चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.

संबंधित घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून ट्रकला बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु झाले. यासाठी अनेक क्लृपत्या लढवण्यात आल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला दोरखंड बांधत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही.

यानंतर जेसीबीने ट्रक बाहेर काढला जाईल, अशी माहिती समोर आली. पण तसं काही झालं नाही. यानंतर क्रेन घटनास्थळी दाखल होईल, अशी माहिती समोर आली.

या घटनेनंतर काही वेळाने अनेक मोठमोठे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. अधिकाऱ्यांनी पाहणी करुन योग्य ते मार्गदर्शन केलं. पण घटनेनंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी क्रेन पोहोचली. घटना घडून अडीच तास झाले तरी क्रेन न पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली होती.

या दरम्यान प्रशासनाकडून पडलेल्या ट्रॅकच्या बाजूला बॅरेकटिंग लावण्यात आले होते. यानंतर दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या साहाय्याने ट्रकला यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलं. ट्रक बाहेर निघाल्यानंतर प्रशासकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

दरम्यान, संबंधित घटना कशी घडली? याचा तपास होतो का, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेची संपूर्ण पुणे शहरात चर्चा सुरु आहे. ट्रकचं वजन इतकं होतं की रस्ता खचला की त्यामागे आणखी वेगळं काही कारण होतं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिथे भगदाड पडलं तिथे याआधी विहिर होती का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

तसेच अशाप्रकारे घटना घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाईल, याकडे आता पुणेकरांचं लक्ष असणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy