मालट्रकने चार गाड्यांना उडविले
खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात रात्री एक वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू वरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडविले. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी, की रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस कॉर्नर’वर मागून येणाऱ्या ट्रकचा (टीएन 46 एस 14 99) ब्रेक फेल झाला. येथे उतार असल्याने ट्रकचा वेग वाढला. त्यामुळे ट्रकाने पुढील चार गाड्यास जोराने ठोकरले. त्यानंतर या गाड्या रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्या.
दरम्यान, हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना घडताच भुईंज महामार्ग पोलीस यांच्या नेतृत्वाखाली निंबाळकर, गायकवाड, खंडाळा पोलिस परांदे व इतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
