Explore

Search

April 13, 2025 10:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : साताऱ्याच्या मोर्चे बांधणीसाठी शिवसेना शिंदे गट ॲक्शन मोडवर

जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक, लाडक्या बहिणींशी होणार संवाद

सातारा :  सातारा जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेत कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले. तसेच पितृपंधरवडा संपल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची थेट संवाद यात्रा सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

स्वतः जिल्हाध्यक्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणांगणात उतरले असून या बैठकीतून शिवसेना कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. या बैठकीला जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रंजीत भोसले, सुलोचना पवार, हेमलता शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक पैलवान गोडसे, चंद्रकांत गुरुजी, वासूदेव माने, बाळासाहेब जाधव तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र मध्ये महायुतीचे तिन्ही घटक पक्ष सक्रिय झाले आहेत .लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी चांगली राहिली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही झाले आहेत. सातारा कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागेवर शिवसेनेचा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडकवायचा आहे, त्या दृष्टीने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश देऊन त्यांची मनोगते जाणून घेतली. प्रत्यक्ष कामकाजात त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांची मनोगते काय आहेत, याच्यावर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या चर्चेमध्ये शिंदे गटावर अन्याय झाल्यास जिल्ह्यातील आठही मतदारसंघांवर दावा ठोकण्याची शिंदे गटाची तयारी आहे. शिंदे साहेबांना महायुतीमध्ये बळ देण्याकरता सर्व शिवसैनिक प्राणपणाने सज्ज राहतील, अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी मांडली. पुरुषोत्तम जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या बांधणीमध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. शिवसैनिकांनी बूथ लेवल पासून प्रामाणिकपणे काम केल्यास कोणताही विजय अवघड नाही. जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या सर्व भावना या एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन पुरुषोत्तम जाधव यांनी दिले. तसेच यावेळी सातारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला. लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना ठरली आहे, या माध्यमातून महिला संघटनेचे मोठे जाळे जिल्ह्यात उभे राहिले आहे. लाडक्या बहिणींना सातारा जिल्ह्यात काय अडचणी येत आहेत, तसेच शासनाने राबवलेल्या कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत याची माहिती देण्यासाठी पितृ पंधरवड्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातून शिंदे गटाची संवाद यात्रा सुरू होईल, असे स्पष्ट संकेत पुरुषोत्तम जाधव यांनी दिले आहेत. पुरुषोत्तम जाधव यांनी सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी बूथ रचना, तसेच शासकीय योजनांचा प्रसार व प्रचार या सर्व दृष्टीने सुचित केले असून, शिवसैनिकांनी त्या दृष्टीने तयारीत रहावे असे निर्देशित केले आहे.

जाधवांचा जिल्हा दौरा पण लक्ष मात्र वाई विधानसभा मतदारसंघावर :

सातारा जिल्ह्याला अद्यापही दुष्काळी म्हणून शिक्का लागलेल्या खंडाळा तालुक्याचा एकही आमदार नसल्याची खंत आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून लढण्याची भूमिका सोडलेली नाही. 2009 पासून गेल्या सोळा वर्षात पुरुषोत्तम जाधव यांचा जनाधार हा सातत्याने दिसून आला आहे. खंडाळा तालुक्याचे दुष्काळ प्रश्न सोडवण्याकरता पुरुषोत्तम जाधव यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका घेऊन निधी आणला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पुरुषोत्तम जाधव यांचा जिल्हा दौरा सुरू होणार असला तरी, त्यांचे लक्ष वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघावर आहे. महायुतीच्या राजकीय तडजोडीत बऱ्याचदा त्यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे थांबावे लागले, मात्र यंदा पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्याचे अस्मितेसाठी आक्रमक होणार हे निश्चित आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy