भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे बांगलादेशला झटपट बाद करण्याचं आव्हान होतं. पण मोमिनुल हकने एका बाजून चिवट झुंज दिली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या बाजूने विकेट घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि झालंही तसंच. मोमिनुल हक शेवटपर्यंत नाबाद 107 धावांवर राहिला. तर दुसऱ्या बाजूने 7 विकेट पडल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिली विकेट मिळवून दिली. मुशफिकुर रहमानला 11 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं. त्यानंतर एक एक करत इतर फलंदाजांना बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं. लंच ब्रेकनंतर तीन गडी झटपट बाद केले आणि बांगलादेशचा खेळ 233 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाला एक गडी बाद करण्यात यश आलं. बांगलादेशचा खालिद अहमद हा रवींद्र जडेजाचा कसोटी क्रिकेटमधील 300 वा बळी ठरला. त्याच्या विकेटसह बांगलादेशचा कानपूर कसोटीतील पहिला डाव संपुष्टात आला.
बांगलेशकडून झाकीर हसन आणि खालिद अहमद यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. शदमन इस्लामन 24, नजमुल होसेन शांतो 31, मुशफिकुर रहमान 11, लिटन दास 13, शाकीब अल हसन 9, मेहिदी हसन मिराज 20, तैजुल इस्लाम 5, हसन मेहमुद 1 या धावसंख्येवर बाद झाले.
