बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी घुसल्याचे सकाळी वृत्त आले. अभिनेत्याच्या पायाला स्वत:च्याच बंदूकीतून गोळी लागली आहे, ही घटना गोविंदाच्या मुंबईतल्या जुहूमधील घरी घटना घडली आहे. अभिनेत्याला गोळी लागल्यानंतर तात्काळ त्याला मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या पायावर सध्या उपचार सुरू असून त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
डॉक्टरांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातली गोळी काढल्याची माहिती अभिनेत्याचा मॅनेजर शशी सिन्हाने दिली आहे. दरम्यान अभिनेत्याने ऑडियो नोटच्या माध्यामातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “नमस्कार, मी गोविंदा… तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी अगदी सुखरूप आहे. माझ्या पायाला गोळी लागली होती, ती काढण्यात आली आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे मी आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद…” अशी पहिली प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.
गोविंदाची मुलगी टीना आहुजा हिने एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की, “सध्या मी माझ्या वडिलांसोबत आयसीयूमध्ये आहे. मी सध्या जास्त बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगते की, वडिलांच्या तब्येतीत आधीपेक्षा उत्तमरित्या सुधारणा झाली आहे. पायाला गोळी लागल्यानंतर वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायाचे ऑपरेशनही यशस्वीरित्या झाले आहे. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून सर्व रिपोर्ट व्यवस्थित आले आहेत. वडिलांना आजच्या दिवस तरीही आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. पुढे त्यांच्या तब्येतीनुसार त्यांना आयसीयुमध्ये ठेवायचे की नाही हे डॉक्टर ठरवतील. डॉक्टर सतत पप्पांची देखरेख करत आहेत. काळजी करण्याची गरज नाही, धन्यवाद.”
परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्याला गोळी लागली. त्याच्या गुडघ्याजवळ गोळी लागली असून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा पहाटे ४.४५ वाजता शूट करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. परवानाधारक रिव्हॉल्व्हर तपासत असताना त्याचा नेम चुकला आणि अभिनेता जखमी झाला. गोविंदा यांच्यावर मुंबईतल्या क्रिटी केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
