मुंबई : आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. हजारों वर्षांच्या इतिहास असलेल्या आपल्या भाषेला आज अभिजात म्हणून ओळख मिळाली आहे. राज्य सरकारचा अनेक वर्षांचा लढा यशस्वी झाला असून मराठी माणसांसाठी हा निर्णय लाखमोलाच मानला जात आहे. केंद्र सरकारने घेतलेला या निर्णयामुळे मराठी भाषा सातासमुद्रांपार पोहोचण्यास आणखी वेग येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने बैठकीत मराठी भाषेसह अन्य पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, एवढ्या जगात माय मानतो मराठी! धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद! अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर मराठीमध्ये पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी म्हणाले की, “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
