मुंबई : लोकप्रिय मराठी कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी 5’ चा ग्रँड फिनाले रविवारी (6 ऑक्टोबर) पार पडला. टॉप 6 स्पर्धकांमधून सूरज चव्हाणनं आपला जलवा दाखवत या सीझनची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. ‘गुलिगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणवर आता चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सूरजची सोशल मीडियावर हवा : टॅलेंट असलं की माणूस श्रीमंत असो की गरीब तो यशाच्या शिखरावर जातो म्हणजे जातोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सूरज चव्हाण हा गरीब घरातून पुढं आला. आई-वडिलांच्या निधानानंतर तो पोरका झाला. मात्र, बहिणींनी त्याला साथ दिली. सोशल मीडियावर सूरज प्रचंड व्हायरल आहे. बोलीमुळं तो घराघरत माहिती झाला. सूरजमुळंच आम्ही ‘बिग बॉस’ बघते, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या.
सूरजला मिळाले सर्वाधिक वोट : अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होते. अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीतला ‘बिग बॉस मराठी 5’ चा उपविजेता ठरल्यानं त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवलं होतं. सूरज चव्हाणनं सर्वाधिक वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं.
आठवीपर्यंतच शिक्षण : सूरज चव्हाणचा जन्म 1992 मध्ये बारामती तालुक्यातील मोडवे गावात झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब होती. सूरज लहान असतानाच त्याच्या वडिलांचं कर्करोगामुळं निधन झालं. तर आजारपणामुळं त्याच्या आईचं देखील निधन झालं. गरीबीमुळं सूरजला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीनं सूरजचा सांभाळ केला.
‘बुक्कीत टेंगूळ‘, ‘गुलिगत धोका‘मुळं प्रसिद्ध : सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून TikTok या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल माहिती मिळाली. त्यानं दुसऱ्याच्या मोबाईलवरून पहिला व्हिडिओ बनवला होता. पहिलाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर मजुरीतून मिळालेल्या पैशातून त्यानं मोबाईल घेतला. त्याच्या खास स्टाइलमुळं तो सोशल मीडियावर दिवसेंदिवस खूप लोकप्रिय झाला. त्यानं इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘गुलिगत धोका’ या डायलॉगमुळं आणि मजेशीर रिल्समुळं सूरज चांगलाच फेमस झाला.
