माची परिसरातील विस्फोट प्रकरणाच्या चौकशीची मागणी
सातारा : शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात झालेल्या जोरदार स्फोटासंदर्भात अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता भयंकर होती. संबंधित चिकन दुकानाला परवानगी होती का? ती कोणाकडून देण्यात आली होती? या घटनेची वस्तुस्थिती तसेच या प्रकरणातील सामील लोक यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी थेट मागणी पत्रकाद्वारे आम्ही सातारकर या नावाने माची व केसकर पेठेतील नागरिकांनी केली आहे.
या नागरिकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड घोषणाबाजी केली. सुमारे दीडशेहून अधिक आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना रोखले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ पाच आंदोलकांना निवेदन सादर करण्यास परवानगी दिली.
भाजप युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद आहे की, चिकनच्या दुकानात जो स्फोट झाला तो सातारा जिल्ह्यातील तिसरा प्रकार आहे. यापूर्वी कराडमध्ये सुद्धा असाच स्फोटाचा प्रकार झाला होता. या मागची अद्यापही खरी माहिती समोर आलेली नाही. सदर चिकन दुकानाचे शॉप ऍक्ट लायसन आहे का? चिकन दुकान चालवण्यास त्याला परवानगी कोणी दिली? सदर इसम चिकनच्या दुकानाच्या नावाखाली अपकृत्य करत होता. तसे असेल तर त्यामध्ये कोण कोण सामील होते? सातारा जिल्हा आणि जिल्ह्यातील लोक हे सुरक्षित आहेत का? पोलीस नक्की कोणाला पाठीशी घालत आहेत, असे विविध प्रश्न या पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी कराडमध्ये झालेल्या एका रॅलीमध्ये एका विशिष्ट समुदायाला अपशब्द वापरण्यात आले होते. सातारा पोलीस अधीक्षक या प्रकरणाच्या संदर्भात ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. या सर्व प्रकरणाचा राष्ट्रीय तपास एजन्सी कडून तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
