सातारा : नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.
नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळे तसेच अनेक संस्था गरबा स्पर्धेचे आयोजन करत असतात. यासाठी शहरातील विविध भागांत गरबा प्रात्यक्षिकांचे शिबिर भरवण्यात आले आहे. या काळात तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. यासाठी तरुणाईकडून बाजारात गरबा खेळण्यासाठी लागणार्या साहित्यांची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात यासाठी विविध प्रकारच्या दांडिया, गरबा खेळण्यासाठी लागणारे कपडे, टोप, तरुणींसाठी लागणारे अलंकार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची चिन्हे आहेत.
नवरात्रोत्सवात तरुण-तरुणींचा उत्साह शिगेला पोहोचतो. तसेच उत्सवात अनेक मंडळे, संस्था गरबा, दांडियाच्या स्पर्धा आयोजित करत असतात. त्यामध्ये तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतो. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे साहित्य, कपडे खरेदीला या दिवसांत मागणी वाढत असल्यामुळे बाजारात आताच साहित्य उपलब्ध झाले आहे. यात निरनिराळ्या प्रकारच्या दांडिया, गुजराथी-मारवाडी प्रकारचे कपडे बाजारात बघायला मिळत आहेत. यामध्ये दांडियाची जोडी 40 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. तसेच गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे कपडे बाजारात भाड्याने मिळत असून, एक दिवासाला 150 रुपयांपासून पुढे भाडे आकारले जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गरबा प्रशिक्षणाची कार्यशाळा सुरू आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. गरबामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, टिटाडा दोन ताली, छगडी, रास गरबा या प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते.
