सातारा : सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सुमारे ६५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जीवन विद्या मिशन या संस्थेच्या ट्रस्टी पदी साताऱ्यातील प्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर चोरगे यांची सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.
सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर चोरगे हे गेली २५ वर्षे या संस्थेत कार्यरत असून त्यांनी सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या जीवन विद्या मिशनचा निरपेक्ष प्रचार व प्रसार केला. त्यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या संस्थेच्या शाखा उघडण्यात मोठे योगदान दिले आहे.
१९९९ साली सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी सातारा शहरात केले होते. त्यावेळी सातारकरांना पहिल्यांदाच सद्गुरूंचे जीवन विद्येचे विचार ऐकण्याची व जाणून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमापासूनच खऱ्या अर्थाने सद्गुरूंचे व श्री चंद्रशेखर चोरगे यांचे ऋणानुबंध जुळले. तेव्हापासून चोरगे यांनी जीवन विद्या मिशनच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
सद्गुरु श्री वामनराव पै यांनी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या अमृत विचारांचा प्रसार केला. सुशिक्षित हवचं.., पण त्याच बरोबर सुसंस्कारीत सुद्धा हव.. हे सुसंस्कार जीवन विद्या मिशन सर्व स्तरांसाठी, सर्व घटकांसाठी तसेच समाजातील सर्व धर्म, पंथ, जाती तसेच सर्व वयोगटांसाठी विविध माध्यमातून पोहोचवत आहे. सद्गुरूंची जीवन विद्येबाबतची विविध पुस्तके उपलब्ध असून या पुस्तकांमधूनही समाजप्रबोधनाचे कार्य अखंड पुढे चालू आहे. जीवन विद्या मिशनचे सुख, शांति, समृद्धी मिळवण्यासाठी विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठीही विविध कोर्सेस व सेमिनार आयोजित केले जातात. याला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. या संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात दोन कोटींहून अधिक नामधारक आहेत.
