फक्त काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा; रहाल फिट अँड फाईन
आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी-कधी बाहेर जाणे आणि फिरणे कठीण होऊन बसते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही घराबाहेर न पडताही 10 हजार पावलं चालून सहज पूर्ण करू शकता? फक्त काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा आणि घरात राहूनही तंदुरुस्त आणि सक्रिय रहा.
रोज 10000 पावलं चालण्याने तुम्ही फिट आणि फाईन राहता आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचले असेल. अगदी तुमच्या स्मार्टवॉचमध्येही तुम्ही फिटनेस सेट केला असेल. पण त्यासाठी आता तुम्हाला बाहेर जाण्याचीही गरज नाही. तुम्ही घरातच 10000 पावलं चालून रोज पूर्ण करू शकता.
येथे आम्ही तुम्हाला असे 5 आश्चर्यकारक मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पावलांचे लक्ष्य साध्य करू शकता. यासाठी फिटनेस फ्रिक असणाऱ्या कोच श्रद्धा सांगडे यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ती वाचून तुम्हीही घरातल्या घरात आता 10000 पावलं चालून पूर्ण करू शकता .
फोनवर बोलताना
फोनवर बोलताना चाला
फोनवर बसून बोलण्याऐवजी उभे असताना किंवा चालताना बोला. रोज चालण्याच्या पावलांची संख्या वाढवण्याचा हा एक जुना पण प्रभावी मार्ग आहे. ऑफिस कॉल असो किंवा मित्रांशी संवाद असो, चालताना बोलणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घरी असा अथवा ऑफिसमध्ये, रोज फोनवर चालून बोला यामुळे तुमचा व्यायामही होतो आणि तुमचे कामही होतं.
बाल्कनीत चालणे
घराच्या बाल्कनीत चालू शकता
तुमच्याकडे मोठी बाल्कनी किंवा टेरेस असेल तर सकाळी तिथे तुम्ही चालू शकता. यामुळे तुम्हाला ताजी हवा तर मिळेलच, पण नैसर्गिक सूर्यप्रकाशही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. पक्ष्यांचा आवाज आणि हिरवेगार वातावरण अनुभवताना चालणे तुमचा मूड सुधारेल आणि तुम्ही रोज योग्य पद्धतीने चालू शकता. याशिवाय तुम्हाला बाहेर जाण्याचा त्रासही होणार नाही.
जेवणानंतर चालणे
जेवण झाल्यावर त्वरीत बसू नका चाला
नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालणे केवळ पचनास मदत करत नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. जेवणानंतर 5-10 मिनिटे हलके चालणे तुमचे शरीर उत्साही ठेवते आणि 10 हजार पावलं चालण्याचे लक्ष्य गाठण्यास मदत करते. तसंच यासाठी तुम्हाला अगदी वेगाने चालण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हलके चालू शकता.
आवडत्या गाण्यावर डान्स
गाण्यावर डान्स करणेही ठरते उत्तम
नृत्य करणे केवळ मजेदारच नाही तर ती एक उत्तम कसरतदेखील आहे. तुमच्या आवडत्या गाण्यांवर डान्स करा आणि तुमच्या स्टेपची संख्या वाढवा. तुम्ही ऑनलाइन डान्स ग्रुप्समध्ये देखील सामील होऊ शकता, जे तुम्हाला अधिक मजा आणण्यास आणि तुमचा उत्साह वाढविण्यास मदत करेल. नृत्य हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, ज्यामुळे कॅलरीजदेखील बर्न होतात.
