Explore

Search

April 5, 2025 1:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सातारकरांनी अनुभवला दसरा सणाचा शाही बाज

दहा तासांच्या मिरवणूकानंतर आदिशक्तींना भावपूर्ण निरोप

सातारा : ऐतिहासिक शाहू नगरीने शनिवारी विजयादशमीचा अर्थात दसर्‍याचा शाही बाज अनुभवला. हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक वेशातील मावळे अशा शिवकालीन स्वरूपात सातार्‍यातून दसर्‍याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायंकाळी पाच नंतर जलमंदिर येथे मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच दुर्गा दौड निमित्त आयोजित धारकर्‍यांनी पोवाडा गायन केले परंपरेनुसार जलमंदिर येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. या तलवारीस पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यानंतर भवानी तलवारीसह शाही मिरवणूक जलमंदिर राजवाडा गांधी मैदान तेथून राजपथ मार्गे पोवई नाका येथे मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी हत्ती, उंट, घोडे, त्याचबरोबर ढोल-ताशा पथक यांनी मिरवणुकीमध्ये रंगत आणली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक झाल्यानंतर येथे तलवारीचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या विधीचे पौरोहित्य उपेंद्र धांदरफळे यांनी केले. त्यानंतर मिरवणूक पुन्हा जलमंदिर कडे मार्गस्थ झाली. सायंकाळी साडेसात नंतर उदयनराजे यांच्यासह राजमाता कल्पनाराजे आणि इतर सदस्यांनी पारंपारिक सोने लुटण्याचा कार्यक्रम करत एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीत सातारकर मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. सातारा शहरांमध्ये 33 सार्वजनिक मंडळांनी दुर्गा देवीची स्थापना केली होती. त्यांच्या मिरवणुका रात्री सात नंतर उशिरा राजपथावरून निघाल्या. यावेळी मोती चौक, राधिका चौक, बसपा पेठ ते कृत्रिम विसर्जन तळे असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही मिरवणूक तब्बल दहा तास सुरू होती. रात्री उशिरा अडीच च्या नंतर मिरवणूक सोहळ्याची सांगता झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy