सातारा : रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामधील १८ वर्षांच्या पुढील प्रौढ विशेष मुलांनी बनवलेल्या “रोटरी दिवाळी कीट” चे उद्घाटन श्रेणीकभाई शाह- व्यवस्थापक- म्हसवडकर सराफ- सातारा यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कीटला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी श्रेणीकभाई शाह म्हणाले की, सामान्यांनाही लाजवेल अशा पद्धतीने ही विशेष मुले अतिशय मन लावून काम करत आहेत. रोटरी ट्रस्ट करत असलेले हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. असे म्हणून त्यांनी दिवाळी कीट च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावर्षीच्या दिवाळी किट मध्ये मोती साबण, बजाज अल्मंड ऑइल, परफ्युम, अत्तर, कापूर, रांगोळी, रांगोळी छाप, अगरबत्ती, मातीच्या पणत्या-४ नग, समईवात, उंबरापट्टी, लक्ष्मी पूजा साहित्य, कुपन पुस्तिका इत्यादी वस्तूंचा समावेश असून हे दिवाळी कीट आज पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दिवाळी कीटचे बाजारमूल्य ३७५/ रुपये असून हे कीट डिस्काउंट रेट मध्ये ३००/रुपये प्रति अशा माफक दरात ठेवण्यात आलेले आहे.
यावेळी रोटरी ट्रस्टचे चेअरमन रो. डॉ. जवाहरलाल शाह यांनी रोटरी ट्रस्ट विषयी माहिती दिली. व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे चेअरमन रो. सचिन शेळके यांनी दिवाळी कीट उपक्रमाची माहिती दिली. ट्रस्ट सेक्रेटरी रो. डॉ. मुकेश पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे प्रेसिडेंट रो. संदीप जाधव, रो. निवास पाटील, स्कूल कमिटी चेअरमन रो. सुहास शहाणे, ट्रस्टचे रो. राजेंद्र पवार, रो. डॉ. सुनीता पवार, रो.राहुल गुगळे तसेच आनंदबन विशेष मुलांची शाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व बालक मंदिर चे विद्यार्थी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
