सातारा : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी मसापचे कोषाध्यक्ष विनोद सुर्यनारायण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
विनोद कुलकर्णी यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. विनोद कुलकर्णी हे गेल्या 13 वर्षांपासून मसापच्या माध्यमातून काम करत आहे. कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या नामशेष होणा-या घराची उभारणी करुन त्याचे स्मारकात रुपांतर करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सलग 8 वर्षे पाठपुरावा केला आहे. ‘छोट्या बँकेची मोठी गोष्ट’ या प्रसिध्द पुस्तकाचे ते लेखक आहेत. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळावर त्यांच्या रुपाने सातारा शहराला पहिल्यादांच प्रतिनिधीत्व मिळाले आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ अध्यक्ष आ. भरतशेठ गोगावले, खा. श्री.छ.उदयनराजे भोसले, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, उद्योजक विक्रम पाटील, मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सौ. सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ आणि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रिया
या निवडीचा मनापासून आनंद वाटतो, या निवडीच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात आणखी नवीन काम करता येईल. साहित्य क्षेत्राचा नावलौकिक अधिक वाढेल असे काम भविष्यात निश्चित करेन अशी प्रतिक्रिया निवडीनंतर विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
