तिघांचा होरपळून मृत्यू
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या 10व्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई मधील अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील रिया पॅलेस इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. ही इमारत 14 मजली असून इमारतीच्या 10व्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कूलिंगचे काम सुरू केले आणि इमारतीच्या 10व्या मजल्यावरील रूममधील तिघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील कूपर रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
