सध्या महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. असे असताना समीर वानखेडे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : महाराष्ट्रात दोनच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. त्यातच भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली जात आहे. ते मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून, अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता ते समीर वानखेडे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार?
सध्या महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. असे असताना समीर वानखेडे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, त्यांना मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे.
चेन्नई एनसीबीमध्ये नियुक्ती
समीर वानखेडे हे सध्या चेन्नई एनसीबीमध्ये कार्यरत आहेत. आता ते धारावीतून निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे. त्यानुसार, ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राजकारणात राहून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ते प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
समीर वानखेडे-ज्योती गायकवाड आमनेसामने?
धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीतही त्या विजयी झाल्याने आता त्यांच्या जागी त्यांच्या बहिण ज्योती गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले. जर त्यांना उमेदवारी मिळाल्यास समीर वानखेडे-ज्योती गायकवाड आमनेसामने येणार असल्याचे म्हटले जात आहे.
