सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उमा प्रभू यांनी नुकतेच शालामाउलीला सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध संगीत मार्गदर्शक सुरेशराव साखवळकर, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, शालेय समितीचे सदस्य अनंतराव जोशी, सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी करताना शाळेच्या इतिहासाची आणि शैक्षणिक योगदानाची ओळख मान्यवरांना करून दिली.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी, ‘डे.ए.सो. चा उज्वल परंपरेस साजेसे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत असलेल्या या शाळेने, उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख उंचावणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींचा अनेक पिढ्या घडवल्या, ही बाब शाळेला शिखरावर नेणारी आहे. न्यू इंग्लिश स्कूल सातारा हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आहे असे नमूद करून, शाळा माऊलीच्या उत्सवाबरोबरच लोकशाहीचाही उत्सव सुरू आहे. तरी राष्ट्रीय भावनेतून मतदानाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे आवर्जून आवाहन केले.
शालेय समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी यांनी सर्वांचे आभार मानत प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. शालाप्रमुख सुजाता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा येथील दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या शबनम तरडे नवीन मराठी शाळेच्या हेमा जाधव, बालक मंदिरच्या मंजिरी देशपांडे यांचे सह मराठी साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, शाळेच्या उपमुख्याध्यापिका विनया कुलकर्णी व पर्यवेक्षक अनिता कदम, जनार्दन नाईक, राजेश सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सातारा शहरातील मान्यवर माजी विद्यार्थी निळकंठ पालेकर, संदीप श्रोत्री, निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, जाधव, बहुसंख्य शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व सातारकर नागरिक उपस्थित होते.
