सातारा : स्कूल बस व व्हॅनमधून शाळेत जाणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूल बस व व्हॅनची धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत नियमभंग करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व फलटण (आरटीओ) मार्फत स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी वायुवेग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन वाहतूकदारांकडून होत आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे का? विशेषत: स्कूल बसमध्ये महिला मदतनीसाची नेमणूक केली आहे का? याची तपासणी वायूवेग पथकामार्फत केली जात आहे.
याचबरोबर शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना भेटून आरटीओचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीत पोलिस आरटीओचे अधिकारी, पालक प्रतिनिधींचा समावेश असतो. प्रत्येक शाळेकडून शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेतले जात असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी सांगितले.
जिल्ह्यात 397 स्कूल बसची तपासणी..
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत सातारा जिल्ह्यात 397 स्कूल बसची तपासणी करण्यात आली. विद्यार्थी वाहतूक करणारी 81 अवैध वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 90 स्कूल बस व 13 विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती दशरथ वाघुले यांनी दिली.
शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन सर्व शाळांनी करणे बंधनकारक आहे. याचे पालन शाळा विद्यालयाकडून होते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळणार्या शाळांवर कारवाई करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडे केली जाईल. – दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा
