सातारा : निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणार्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकांच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकांच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.
फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणार्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणार्या मालकांनी तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवारांचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. तसेच आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.
तीन वाहने, पाच व्यक्ती…
उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांचा समावेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस मिरवणूक सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
