नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या
विधानसभा निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना मतदान करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने निवडणुकीच्या काळातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला ठेवण्यात आलेल्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पण याच दिवशी मुंबई विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखांच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना मतदान करण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुतांश विद्यार्थी मतदानासाठी गावी जात जातात. परीक्षेच्या कालावधीत त्यांना प्रवास करून गावी जाणं शक्य नव्हतं. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती.
युवा सेनेने (शिंदे गट) मतदानाच्या दिवशी असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचं पत्र परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे यांना दिलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदान करता यावं, म्हणून मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
