सातारा : दीपावलीला घरोघरी पै- पाहुण्यांचा राबता वाढणार आहे. खाद्यतेलातसह भुसार मालाची दरवाढ झाली असतानाच कांदा व लसणाच्या दरवाढीची फोडणी बसत आहे. स्वयंपाक घरात हरएक मसाल्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा व लसणाच्या दरातील तेजी कायम असल्याने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे.
दर वाढला असूनही शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने हा उत्पादक मात्र हताश झाला आहे. दीपावलीचा सण सर्व स्तरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळांनाही दिवाळी सुट्ट्या असतात.
त्यामुळे घरोघरी पै-पाहुण्यांचा राबता वाढतो. त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये यासाठी यजमानांचे प्रयत्न राहतात. त्यासाठी पक्वान्नांचे बेत आखले जातात. त्यासाठी आवश्यक मसाल्यांमध्ये कांदा, लसणाचा वापर अधिक होतो; मात्र मागील दोन महिन्यांपासून कांदा व लसणाचे दर भडकले आहेत.
मागील १५ ते २० दिवसांमध्ये सर्वच भाज्या ८० ते १०० रुपये किलोने मिळत असून कांदा साधारण ४० रुपये ते ७० रुपये किलो तर लसूण ३०० ते ४०० रुपयांपर्यंत दराने विकला जात आहे. यामुळे गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
कांद्याचे दर वाढले असले तरी सध्या केवळ व्यापारी वर्गाकडेच कांदा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी दहा ते बारा रुपये किलोना कांदा व्यापाऱ्यांना विकला. आज त्याच कांद्याच्या दरात चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. परंतु, उत्पादक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक नसल्याने तो हताश झाला आहे.
