विमानसेवाही स्थगित
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले आहे. हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चक्रीवादळमुळे किनारपट्टी भागात विशेष करून कोलकाता आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. चक्रीवादळ दरम्यान, वाऱ्याचा कमाल वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे साामन्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दाना चक्रीवादळ 24- 25 ऑक्टोबर रोजी पूर्व भारतात पोहोचण्याची शक्यता असून देशाच्या या भागात रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे 15 तासांसाठी 25 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरच्या सकाळी चक्रीवादळ दाना भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशाच्या धामरा बंदरादरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, दाना चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विमान आणि रेल्वेच्या कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 23 ऑक्टोबर ला रेल्वे बोर्ड, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वे सेवेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रेल्वेच्या तयारीवर चर्चा केली.
विमानसेवाही स्थगित
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन प्रमुख एअरलाइन्सने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. इंडिगोने आपल्या प्रवाशांना कोलकाता आणि भुवनेश्वरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये संभाव्य व्यत्ययाबद्दल चेतावणी दिली आहे. विमान कंपनीने विनंती केली आहे की प्रवाशांनी त्यांच्या वेबसाइटच्या मदतीने फ्लाइटच्या स्थितीबद्दल अपडेट राहावे.
तसेच तिकीट रद्द झाल्यास, परतावा किंवा पर्यायी बुकिंगची सुविधा देखील प्रदान केली जात आहे. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी म्हणाले की, चक्रीवादळ येण्यापूर्वी राज्यातील सुमारे 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले आहे.
