उद्धव ठाकरे शिवसेनेच्या तिकिटावर सातार्याच्या निवडणूक आखाड्यात एंट्री
सातारा : सातारा-जावली विधानसभेत मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बहुप्रतिक्षित उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या रस्सीखेचीमध्ये सातारा- जावली विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला असून तेथून अमितदादा कदम यांनी शिवबंधन स्वीकारलेे आहे. त्यामुळे सातारा विधानसभेच्या आखाड्यात त्यांची एन्ट्री नक्की झाली आहे. येत्या दोन दिवसात कदम आपला अर्ज दाखल करतील.
अमितदादा कदम आणि त्यांचे समर्थक मुंबईमध्ये तळ देऊन होते. महाविकास आघाडीच्या शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या पहिल्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर झाल्यानंतर सातारा विधानसभा मतदारसंघातून कोण, हा प्रश्न वाड्या-वस्त्यांमधून आणि चौका-चौकातून चर्चिला जात होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने पहिल्याच यादीमध्ये जाहीर करून टाकली. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान कोण देणार? हा प्रश्न सातारकरांसाठी अतीशय उत्सुकतेचा होता. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार सातार्यात काय खेळी खेळणार? याची सुद्धा जोरदार चर्चा होती. मात्र सातार्यात राष्ट्रवादीला तितका तोलामोलाचा कोणताही उमेदवार सापडला नाही.
अमितदादा कदम हे जावलीचे दिवंगत आमदार जी जी कदम यांचे सुपुत्र असून त्यांनी जावलीच्या अस्मितेसाठी दंड थोपटले होते. तिकिटासाठी त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. जावली तालुक्यामध्ये शिवसेनेला मानणारा एक मोठा गट आहे. मात्र त्याचे अस्तित्व विखुरलेल्या स्वरूपात आहे. सातार्यातही शिवसैनिकांची मोठी ताकद आहे. मात्र त्याचे एकत्रित स्वरूप दिसत नाही. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी सुद्धा मुंबईत उमेदवारीसाठी तळ दिला होता. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपली आक्रमक नेता म्हणून प्रतिमा बनवली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सातारा येथील जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली व अमितदादा कदम यांनी मातोश्रीवर जाऊन आज दुपारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला.
सातार्यात आता भाजपच्या वतीने शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम असणार आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला आहे. त्याचप्रमाणे अमितदादा कदम यांनी सुद्धा गावपातळीवरच्या भेटी, युवकांचे मेळावे तसेच गणेशोत्सव, नवरात्री दरम्यान गाठीभेटींच्या माध्यमातून संपर्क अभियान सुरू ठेवले होते. एक क्लीन चेहरा या निवडणुकीत त्यामुळे पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सातार्यातून एक रंगतदार, तुल्यबळ लढत पाहायला मिळणार, हे नक्की.
