गुरूकुल स्कूलमध्ये साजरी करण्यात आली अनोख्या पद्धतीने दीपावली
सातारा : चेहर्यावरचे कावरेबावरे हावभाव, काहींच्या हातामध्ये लहान बाळ, शाळेच्या प्रवेशद्वारावर छोट्या विद्यार्थीनींनी केसात माळायला दिलेले गजरा व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून केलेले स्वागत यामुळे भारावून गेलेल्या सातारा शहरातील विविध भागातील कचरा वेचक महिला भारावून गेल्या. निमित्त होते सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलमधील दीपावलीचे.
सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूल नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबवित असते. त्याच अनुषंगाने सातारा शहरातील विविध भागातील स्वच्छतेचे काम करणार्या महिलांना शाळेने पाहुणे म्हणून याठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या कचरा वेचक महिलांना संपुर्ण शाळेचा परिसर दाखवून उपस्थित विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना कुतुहलाने विविध प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्यांनीही समर्पकपणे उत्तरे दिली. यावेळी साधारण 80 महिला उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांना गुरूकुल स्कूलच्या वतीने गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याकडून दीपावलीचे सर्व सामान असणारे कीट व दीपावलीचे फराळाचे पाकीट देण्यात आले. यावेळी कु. ऐश्वर्या चोरगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
गुरूकुल स्कूलने केलेल्या या अनोख्या पद्धतीच्या स्वागताने उपस्थित महिला भावुक झाल्या. यातील काही महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आम्ही समाजात काम करत असताना समर्पक वृत्तीने व समाजाचे व देशाचेे जबाबदार घटक समजून काम करत असतो, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले, या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करत असताना विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटकांच्या कार्याची ओळख व्हावी, हा हेतु या कार्यक्रमामागे होता. तसेच आजपासून कचरा वेचकाचे काम करणार्या महिला व पुरूष यांना आपण स्वच्छता दुत म्हणून संबोधले पाहिजे व त्यांना आदराची वागणुक देण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्याच्या प्रती प्रामाणिक राहिली तर समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींचा आदर राखला जाईल.
यावेळी आनंद गुरव, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदिश खंडेलवाल, राजेंद्र खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, अनिल वीर, पालक शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक, पालक, सदस्य उपस्थित होते.
