सातारा : आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारसेला गोवत्सपूजनाने दीपोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. पुढील सात दिवस दीपोत्सव साजरा होणार असल्याने घरोघरी आनंदाचे वातावरण राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचे जनमाणसात चैतन्य पसरले आहे. दिवाळीनिमित्त होणाऱ्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवर नागरिकांच्या गर्दीचा महापूर येत आहे. निराशेचे मळभ दूर करून आनंद व मांगल्याचा प्रकाश पसरवत दिवाळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला असून जनमानसात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात असून सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी वसुबारशीला गोवत्सपूजनाने यावर्षीचा दीपोत्सव सुरु होत आहे. गाईला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष स्थान असून दिवाळीत गाई व तिच्या वासराचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आजही ही परंपरा कायम राखत सर्वत्र वसुबारस उत्साहात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी लहान-मोठ्यांसह सर्वांमध्ये चैतन्य पसरले आहे. बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दिपोत्सवाचा माहोल निर्माण झाला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. आकाश कंदिल, पणत्या, उटणे, सुगंधी अत्तर, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, रांगोळीसह कपडे व भुसार दुकानांमध्ये तोबा गर्दी होत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या असून शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. रविवारी सायंकाळी सातारा शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवर गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना सातारकरांना करावा लागला.
मंदिरांसह गोशाळांमध्ये सज्जता…
वसुबारसपासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दीपोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये रंगरंगोटी, स्वच्छता, सजावटीसह पूजेसाठी सज्जता करण्यात आली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाची परंपरा यावर्षीही कायम राहणार असल्याने नागरिकांची गर्दी होणार आहे. पूर्वी गायीच्या पूजनासाठी घरोघरी गाय असत. बदलती जीवनशैली व शहराची वाढती ओद, महागाई यामुळे ग्रामीण भागातही देशी गायीची संख्या कमी झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वसुबारसच्या गोवस्तपूजनासाठी गोशाळेमध्ये महिलांची वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर गोशाळांमध्ये साफसफाईसह दीपोलस्वासाठी सज्जता बारण्यात आली आहे.
