दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला
पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार विरूद्ध अजित पवार असे काका पुतण्याची लढाई महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशही पाहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. यात पुण्यातील जवळपास आठ मतदारसंघांमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत लढत होणार आहे. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे पुणे जिल्ह्यावर कोणत्या पवारांचे वर्चस्व राहणार, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. पुण्यातील या मतदारसंघात अजित पवार विरूद्ध थेट शरद पवार गटाचा उमेदवार अशी लढत होणार आहे.
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बापूसाहेब पठारे, पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम, हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप हे आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ, कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, हडपसर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे चेतन तुपे, वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भीमराव सिद्धार्थ शिरोळे, आणि खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर खडकवासला मतदासंघातून आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरूवातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या गटाला जाहीर समर्थन दिले. पण, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांऐवजी शरद पवार यांच्या गटाची कामगिरी उल्लेखनीय होती. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपली जादू दाखवली, शरद पवार यांच्या गटाला घवघवीत यशही मिळाले. पण अजित पवार यांना मात्र आपला प्रभाव दाखवला आला नाही. धक्कादायक म्हणजे, बारामतीसारख्या आपल्या बालेकिल्ल्यातच अजित पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला. त्यानंतर राजकारणाचं वारही बदललं. लोकसभेपूर्वी अजित पवारांकडे जाणाऱ्यांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवला. अनेकजण सोडून गेलेले आमदार, पदाधिकारी पुन्हा शऱद पवारांकडे घरवापसी करू लागले.
