जिंकली भारतीयांची मने
नवी दिल्ली : भारतीय उद्योग विश्वातील लिजेंड असणारे रतन टाटा यांचे मुंबईत 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे मृत्यूपत्र समोर आले. त्यात त्यांनी घरातील कर्मचाऱ्यापासून आपल्या आवडत्या श्वानासाठी तरतूद करुन ठेवली होती. भारतातील अनेक क्षेत्रात टाटा समूहाचे सामाजिक कार्य सुरु असते. त्यामुळेच टाटा हे नाव भारतीयांच्या मनमानात बसले आहे. आता रतन टाटा यांचा सन्मान ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ रतन टाटा यांच्या नावाने एका इमारतीची उभारणी करणार आहे. टाटा ग्रुप आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील सोमरविले कॉलेजकडून ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा उद्देश विद्यापीठातील अध्यापन आणि शैक्षणिक उपक्रम अधिक दर्जेदार करण्याचा आहे.
इमारतीचे काम 2025 मध्ये सुरु होणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठातील ‘रॅडक्लिफ ऑब्जर्वेटरी क्वार्टर’ मध्ये या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, सोमरविले कॉलेजसोबतची ही भागीदारी टाटांच्या मूल्यांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या नावाने बांधलेली इमारत भारतासाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे. रतन टाटा यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठात रतन टाटा यांच्या नावाने बांधली जाणारी ही इमारत ऑक्सफर्ड इंडिया सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे (OICSD) कायमस्वरूपी ठिकाणही बनणार आहे. हे केंद्र ब्लाव्हॅटनिक स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या समोर स्थित असेल. लंडनस्थित वास्तुविशारद मॉरिस कंपनीकडून या नवीन इमारतीची रचना करण्यात येणार आहे. या कंपनीचा पहिला प्रकल्प ऑक्सफोर्ड विद्यापीठात आहे. ही इमारत 700 चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे.
रतन टाटा यांच्या कार्याचा डंका भारताच नाही तर भारताबाहेर राहणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे तमाम भारतीयांची मने विद्यापीठाने जिंकली आहे. ही इमारत शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ ठरणार आहे.
