मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टीम सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे, या मालिकेचे दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने न्यूझीलंडच्या हाती लागले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेवर विजय मिळवला आहे. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मालिकेचा स्कोअरलाइन काय असेल हे मालिकेतील अंतिम सामना ठरवेल. दरम्यान, तिसऱ्या कसोटीशी संबंधित हा अहवाल समोर आला आहे की, खेळपट्टी कशी असणार आहे? रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की येथे रँक टर्नर खेळपट्टी नसेल, ज्यावर फिरकीपटूंना टर्न मिळेल, परंतु खेळपट्टी पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी योग्य असेल. वेगवान गोलंदाजांना बंगळुरूमध्ये मदत मिळाली आणि पुण्यात फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. मात्र, मुंबईतील वातावरण थोडे वेगळे असू शकते.
वाचा मुंबईच्या खेळपट्टीचा अहवाल
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोमवारी बीसीसीआयचे मुख्य पिच क्युरेटर आशिष भौमिक आणि एलिट पॅनेलचे क्युरेटर तपोश चॅटर्जी आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर रमेश मामुनकर यांनी खेळपट्टीचा आढावा घेतला. “हा एक स्पोर्टिंग ट्रॅक असेल. सध्या खेळपट्टीवर काही गवत आहे. पहिल्या दिवशी ही विकेट फलंदाजीसाठी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे, परंतु दुसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंना टर्न मिळण्यास सुरुवात होईल,” असे एका विश्वसनीय सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये दोन संघांमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. भारताने तो सामना ३७२ धावांनी जिंकला होता, पण त्या सामन्यात पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंची साथ मिळाली होती. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात केवळ ६२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताने २७६/७ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १६७ धावांत गारद झाला. एजाज पटेलने या सामन्यात एका डावात १० विकेट घेत इतिहास रचला होता. त्याचवेळी या सामन्यात अश्विनने ४२ धावांत ८ विकेट घेतल्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही सामन्याचा थोडक्यात अहवाल
पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली, यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघ अवघ्या ४६ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४६२ धावा केल्या. सुरुवातीपासूनच दबदबा दाखवल्यामुळे न्यूझीलंडचा संघ हा सामना ८ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघाने पुन्हा खराब फलंदाजीने सुरुवात केली आणि संघ संकटात होता. पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेक न्यूझीलंडने जिंकले आणि संघाने फलंदाजी घेतली यामध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये २५९ धावा केल्या, तर टीम इंडियाने फक्त १५६ धावा करून संघ बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या संघाने २५५ धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा संघ फक्त २४५ धावा करू शकला आणि संघाला ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
