आजघडीला अनेकांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान करतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डोळ्यांच्या या समस्येला ‘डिजिटल आय स्ट्रेन’ असं म्हटलं जातं. डिजिटल आय स्ट्रेन आजकालच नाही, तर गेल्या काही वर्षांपासून गंभीर समस्या होत चालली आहे. काही अभ्यासकांच्या मते तर साधारणतः ५० टक्के लोकांमध्ये ही समस्या दिसून येते; पण या समस्येकडे दुर्लक्ष होते आहे.
एकदा ही समस्या बाढीला लागली की, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी कॉम्प्युटरसमोर काम करताना स्क्रीनचा उजेड कमी ठेवावा जेणेकरून डोळ्यांबर त्याचा परिणाम होणार नाही. उजेड जास्त असेल, तर डोळे सुकणे, ताण येणे, मान दुखणे यासारख्या समस्या भेडसावतात. त्यामुळे डोळ्यांचे नुकसानच होते.
डोळ्यांचे व्यायाम
डोळ्यांवरील ताण कमी होण्यासाठी काही डोळ्याचे व्यायाम करावेत. डोळे बंद करून आपल्या हातांच्या तळव्यांनी ते झाकून घ्यावेत. हलक्याने हात वरून खाली आणावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच दर काही मिनिटांनी पापण्या मिचकावण्याची सवय लावा.
यामुळे डोळ्यात योग्य तो दमटपणा राहतो आणि कोरड्या डोळ्यांची समस्या निर्माण होण्याची जोखीम कमी होते. तसेच डोळ्यांच्या पापण्या मिचकवल्याने डोळ्यांनाही आराम मिळतो. मांसपेशीवर पडणारा अतिरिक्त दबाव निघून जातो.
डोळे फिरवणे : डोळे चारही बाजूंना फिरवणे हा डोळ्यांसाठी उत्तम व्यायाम आहे. दहमिनिटांपर्यंत डोळे चारही बाजूला फिरवावेत. एकदा घड्याळ्याच्या दिशेने तर एकदा विरुद्ध दिशेने फिरवावेत. त्यामुळे दृष्टी वाढते.
डोळ्यांना मसाज : चेहऱ्याला फेशियल किंवा संपूर्ण शरीराला मसाज करतोच; पण डोळ्यांना मसाज करण्यासाठी आवश्यकता असते. डोळ्यांचा मसाज करताना डोळे बंद करून बाहुल्यांच्या वर करावा. लहान बोटाचा वापर करून हा मसाज करावा. डोळ्यांना आराम आणि पोषण मिळण्यासाठी बदाम तेलाचा वापर करून मसाज करावा.
थोडा आराम : काम करताना अधूनमधून डोळ्यांना विश्रांती मिळायला हवी. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करत असताना दर दहा मिनिटांनी आपली नजर दुसरीकडे वळवा. जवळपास वीस फूट लांब असणारी वस्तू पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
योगसाधना : योगा केल्याने दृष्टीत सुधारणा होते. शीर्षासन, अधोमुखाश्वानासन, सर्वांगासन, धनुरासन इत्यादी आसने केल्याने डोळ्यांना विश्रांती मिळतेच. त्यामुळे नियमित योगअभ्यास नक्कीच फायदेशीर ठरतो.
पौष्टीक आहार: पौष्टीक आहार हा शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक असतो. आहारात अ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास दृष्टी कमी होते. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे आहारात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असावे.
