Explore

Search

April 12, 2025 7:57 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे काय?

लॅप्रोस्कोपीक कधी आणि का केली जाते?

लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यांसाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी त्रासाची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने पोटातील अवयवासंबंधी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपीचा शोध लागण्यापूर्वी पोट उघडून शस्त्रक्रिया कराव्या लागत होत्या. त्यामुळे रुग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. तसेच त्यातल्या जखमा आकाराने मोठ्या व खोल असल्याने त्या भरुन यायला वेळ लागायचा, तसेच काही वेळा पू होणे, संसर्ग (इन्फेक्शन) याचा धोका राहायचा त्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस रहावे लागत होते. पण आता लॅप्रोस्कोपीक तंत्रज्ञानामुळे खूप फरक पडला आहे. लॅप्रोस्कोपीक (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रियेमुळे पोटावरील त्वचेस कमी छेद करावा लागत असल्याने वेदना कमी होतात. रुग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच आपले दैनंदिन कामकाज सुरू करू शकतो.

लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. शरीरावर मोठे छेद न करता केवळ दोन ते तीन छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. हे छेद तीन ते चार मिलीमीटरचे असतात. लॅप्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्युशन असलेला कॅमेरा असतो. जो पोटातील अवयवाचे प्रतिबिंब १५ ते २० पट मोठे करून दाखवण्याचे काम करतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटामध्ये ५ मी. मी. आकाराच्या छोट्या नळीतून घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (अवयामधील तपासणी आवश्यक असलेल्या भागाचा तुकडा घेणे) नमुने देखील घेता येतात.

लॅप्रोस्कोपी का केली जाते?

लॅप्रोस्कोपी बहुतेक वेळा पोटातील अवयवाची आतून तपासणी करून तो अवयव किंवा त्या अवयवाचा अनावश्यक भाग काढण्यासाठी केली जाते किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते.

नॉन-इन्व्हेसिव्ह – पोटाबाहेरून तपासणी करावयाच्या पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा लॅप्रोस्कोपीच्या मदतीने तपासणी महत्वाची ठरते.

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कधी केली जाते?

जगभरात सध्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लॅप्रोस्कोपीक तंत्राचा वापर केला जातो. लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे आता अपेंडिसची शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इन्गायनल हर्निया, हिपेटोबिलरी, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया गर्भाशयाचे विकार संबंधी शस्त्र केल्या जातात शिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर यांसारख्या इतर अवयवांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पटकन आराम मिळू शकतो. परंतु प्रत्येक रुग्णाचा आजार व वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कशी केली जाते?

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया ही सामान्य भूल देऊन केली जाते. पोटाला ५ ते १० मिलीमीटरचा छेद घेवून पोटामध्ये कॅमेरा घातला जातो. त्यानंतर पोटामध्ये कार्बनडाय ऑक्साईड गॅस आवश्यक प्रेशरमध्ये पंप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनव्दारे नळीतून टाकली जाते. ज्यामुळे पोटामध्ये पोकळी निर्माण होवून

आतील अवयव स्पष्ट दिसतात तसेच कॅमेरा मार्फत पोटातील दृश्य पाहण्यास डॉक्टरांना मदत मिळते व ऑपरेशन सुलभ होते. ही यंत्रणा येण्यापूर्वी शस्त्रकियेसाठी पोटावर ६ ते १२ इंच लांब कट करावे लागत असे पण लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमध्ये ३ ते ४ लहान छेद ५ मी मी आकाराचे असतात म्हणून यास की होल सर्जरी (Key hole surgery) असे म्हटले जाते.

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेचे काही फायदे
  • शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा रक्तस्त्राव कमी होतो.
  • पोटाच्या भिंतीचे (Abdominal wall) कार्य अधिक चांगले होते.
  • आतड्यांचे कार्य योग्यपद्धतीने चालते.
  • शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना जाणवतात.
  • जखम लवकर भरुन येते.
  • शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज भासत नाही.
  • रुग्णाच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होऊन तो दैनंदिन काम करु शकतो.
  • ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी असते.
  • कमीत कमी छेद असल्याने हर्निया विकार होणे टाळले जाते.
  • काही वेळा पोटातील अवयवातील गुंतागुंत बाह्य तपासणीतून न दिसणारी असल्यास निदान करण्यासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते.
लॅप्रोस्कोपी शस्त्रकियेनंतर रिकव्हरी

रूग्ण शस्त्रकियेसाठी आवश्यक भूल प्रकियेतून बाहेर आल्यावर काही रूग्णाना थोडा त्रास होवू शकतो. काही अंशी खांद्यांवर वेदना होवू शकतात. शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीतच कमी होतात आणि वेदना राहत नाहीत. सामान्यता शस्त्रकियेच्या दुसऱ्या दिवशी पेशंटला हालचाली करण्यास सांगितले जाते. अल्प अशा पट्टीसह दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला जातो.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy