हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगळेपण आहे. त्यातून रुढी, प्रथा, परंपरा पाळण्याबरोबरच अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्वही त्यात दडलेले आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. गुरुवारी (दि. 31) नरक चतुर्दशी आहे त्यानिमित्त लक्ष्मी, कृष्ण, माता काली, यमराज आणि हनुमान या देवतांचे नरक चतुर्दशीच्यादिवशी पूजन केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला. सुमारे 16 हजार महिलांची नरकासुराच्या कैदेतून मुक्तता केली. म्हणून दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
दिवाळीतील पहिला दिवस हा वसुबारस पूजनाचा, दुसरा दिवस धनत्रयोदशीचा तर तिसर्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून ती दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी काही कामे अत्यंत शुभ मानली जातात. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी लवकर उठून स्नान करतात. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी 14 दिवे लावतात. विशेष म्हणजे या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णाची उपासनाही केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यास महत्त्व आहे. अंघोळीच्या बादलीत तीळ टाकून अंगाला तेल लावून स्नान करतात. त्यानंतर सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. अभ्यंगस्नानासाठी चंदन पेस्ट, उटणे लावतात.
अभ्यंगस्नानाची प्रथा सुरू
एक कथा सांगितली जाते, विष्णूने पृथ्वीचा उद्धार करताना नरकासुराचा जन्म झाला. सुरळीत आणि शांततेत राज्यकारभार सांभाळणार्या नरकासुराची संगत बिघडत गेल्याने एखाद्या असुराप्रमाणे तो द़ृष्ट बनला. त्याचे हे प्रताप बघून वशिष्ठ ऋषींनी त्याला भगवान विष्णूच्या हातून तुझा वध होईल, असा शाप दिला. अहंकार इतका होत गेला की, त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या मुलींना पळवून मनिपर्वतावर एक नगर वसवून तिथे बंद करून ठेवले. त्याने जवळपास सुमारे 16 हजार महिला पळवून नेत बंदी बनविल्या. श्रीकृष्णाने गरूड रथात स्वार होऊन या नरकासुरावर आक्रमण करून नरकासुराचे हे असुरी पर्व संपविले. नरकासुरावर श्रीकृष्णाने मिळविलेला विजय म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करतो. नरकासुराचा वध करताना श्रीकृष्णाच्या शरीरावर रक्त पडले आणि ते काढण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून अंघोळ केली म्हणून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा सुरू झाली.
