सातारा : दिवाळीचा सण म्हटले की एसटी महामंडळाचा मुख्य उत्पन्नाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. वसुबारसने दिवाळीला सुरूवात झाली. मात्र, यंदा विधानसभा निवडणूक लागल्याने सर्व शासकीय कर्मचार्यांना डयुटी लागली आहे. त्यामुळे अनेक चाकरमानी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवासी संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. प्रवासी कमी असल्याने एस. टीच्या उत्पन्नाला चांगलाच फटका बसला आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सातारा विभागाने सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, दहिवडी, वडूज, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव या 11 आगारामार्फत जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. पुणे व मुंबईकडून येणार्या एसटी बसेस हाऊसफूल भरून येत आहेत. मात्र, सातारा आगारातून इतरत्र जाणार्या प्रवाशांची संख्या घटल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. ऐन दिवाळीत बसस्थानकात तुलनेने कमी गर्दी होते.
सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. बहुतांश सरकारी कर्मचार्यांना निवडणूकीची ड्यूटी लावण्यात आल्याने कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत. तर दिवाळी सणाची दि. 1 ते 3 नोव्हेंबरअखेर सुट्टी आहे. त्यामुळे काही कर्मचार्यांनी सायंकाळनंतर आपल्या गावी जाण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे प्रवाशांची थोड्याफार प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. पुणे,मुबंई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव, गोवा, विजापूर,अक्कलकोट, हैद्राबाद या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.
